वाळूज महानगर, (प्रतिनिधी) : साजापूर येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व एका सदस्याच्या रिक्त पदासाठी प्रशासनाकडून निवडणूकीची हालचाल सुरू असताना मतदार याद्यांमधील गोंधळामुळे नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे.
मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करत यादीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी - मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
साजापूर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२७ रोजी संपणार आहे. १२ मे २०२४ रोजी सदस्य शेख बानोबी यांचे, तर १ ऑगस्ट २०२५ - रोजी सरपंच जनार्दन बनसोडे यांचे निधन झाल्याने सरपंच व एका सदस्याचे पद रिक्त झाले आहे.
या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्याचा प्रस्ताव सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीत प्रभाग क्रमांक ३ मधील मतदारांची नावे प्रभाग क्रमांक २१४ मध्ये, तसेच २ व ४ मधील नावे प्रभाग क्रमांक ३ मध्ये समाविष्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भात शेख युसूफ, शेख आय्युब, शेख मुजीब, शेख अनिस, शेख सुलेमान यांनी निवेदनाद्वारे मूळ नोंदींची पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करावी. तसेच दोन्ही रिक्त पदांसाठी एकत्रित पोटनिवडणूक जाहीर करावी, अशी मागणी केली आहे












